- दिनेश पठाडेवाशिम : स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ६३५ गावांतील मिळकतधारकांना प्राॅपर्टी कार्ड देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १८६ गावांतील गावकऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले असल्याची माहिती जिल्हा भूमीअभिलेख विभागाकडून देण्यात आली.
केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या गावांचे ड्रोन सर्वेक्षणचे काम हाती घेतले. त्यातून प्रत्येक घराचा नकाशा, मिळकतपत्रिका उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत समाविष्ट गावांत जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप करण्यात आले. त्यानंतर जिओ टॅगिंग, चौकशी आदी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जात आहे. उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित मालकाला / शेतकऱ्याला त्याच्या जमीनमालकीचे प्रमाणपत्र (ई-प्रॉपर्टी कार्ड) देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
१८६ गावांतील मिळकतधारकांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहेत. प्रॉपर्टी कार्डमुळे मिळकतीचे क्षेत्र, सीमा निश्चित होणार असल्याने ग्रामपंचायतींना करआकारणी करणेही सुलभ होणार आहे. तसेच मिळकतधारकांना देखील कर्ज घेणे, त्यांच्या मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे, तसेच त्याचा नकाशा व सीमा याविषयी माहिती मिळणे सोयीचे होईल. उर्वरित ४४९ गावांतील पीआर कार्ड बनविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दरम्यान, ५५८ गावांतील जिओ टॅगिंग आणि चौकशी पूर्ण झाली असून ७७ गावातील ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. स्वामित्व योजने अंतर्गतची सर्व प्रक्रिया मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यापूर्वीच जिल्ह्यात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केली.
दरम्यान, स्थळपाहणी आणि चौकशीचे काम करण्यास चौकशी अधिकाऱ्यांची कमरता असल्याने विभागीय उपसंचालक डॉ.लालसिंग मिसाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ६ आणि अकोला जिल्ह्यातील ३ चौकशी अधिकारी उपलब्ध करुन दिले. त्यामुळे कामाला गती प्राप्त झाली आहे.