- सुनील काकडेवाशिम - स्थानिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिन्याच्या तिसऱ्या गुरूवारी, १८ जुलैला घेण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनी एकूण ५२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात एकट्या पंचायत विभागासंबंधीच्या ३४ तक्रारी होत्या. त्यातील ३१ तक्रारींचे निवारण करण्यात आले. गत महिन्यातही याच विभागासंबंधीच्या सर्वाधिक ६० तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत पंचायत विभाग, शिक्षण विभाग, डीआरडीए, बांधकाम, भूजल सर्वेक्षण, लघूसिंचन, आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणी व स्वच्छता विभाग, कृषी, पशुसंवर्धन, नरेगा, वित्त यासह २३ विभाग कार्यान्वित आहे. त्यांच्यावर ग्रामविकासाची धूरा सोपविण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना योग्य सोयी-सुविधा पुरविण्यात काही विभागाकडून कसूर केला जातो. त्याची तक्रार त्यांना करता यावी आणि निवारण देखील तातडीने व्हावे, या उद्देशाने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या गुरूवारी तक्रार निवारण दिनाचा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला.
गत महिन्यात २० जून रोजी झालेल्या पहिल्या तक्रार निवारण दिनाच्या उपक्रमात १४६ पैकी १०६ तक्रारींचा फडशा पाडण्यात आला होता. चालू महिन्यात १८ जुलै रोजी एकूण ५२ नागरिकांनी लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या. सीईओ यांच्यासह विभाग प्रमुखांनी दिवसभर ठाण मांडून त्यातील ४८ तक्रारी निकाली काढल्या. ४ तक्रारदार गैरहजर राहिल्याने त्यांच्या तक्रारी प्रलंबित ठेवण्यात आल्या.