लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून प्रलंबित असलेला शिक्षकांचा निवडश्रेणीचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ३ डिसेंबर रोजी ६६९ शिक्षकांची यादी झळकली.जि.प. शिक्षक संवर्गाचे वेतनश्रेणी प्रस्ताव मागील ३ वर्षांपासून व निवडश्रेणी प्रस्ताव वाशिम जिल्हा अस्तित्वात आल्यापासून प्रलंबित होते. यासंदर्भात शिक्षकांच्या विविध संघटनांनी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर व रमेश तांगडे यांच्याशी चर्चा केली. सहायक प्रशासन अधिकारी गजानन खुळे व चमूने या कामी गत दीड महिन्यांपासून प्रशासकीय सोपस्कार पार पाडले. वरिष्ठ श्रेणी केंद्रप्रमुख ५, मुख्याध्यापक १६, पदवीधर शिक्षक ८, सहायक शिक्षक ४७४, उच्चश्रेणी शिक्षक ३ व अधिव्याख्याता ३ असे एकूण ५०९ वेतनश्रेणी तसेच निवडश्रेणी पदवीधर २, सहायक शिक्षक १४८, उच्चश्रेणी शिक्षक ६ व अधिव्याख्याता ४ असे एकूण १६० शिक्षक संवर्गातील वरिष्ठ निवडश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. उपरोक्त एकूण ६६९ शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे आदेश जारी करण्यात आले. या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर झळकली आहे. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनश्रेणी व निवडश्रेणीचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार हा प्रश्न निकाली निघाला. पदोन्नती यासह अन्य प्रलंबित प्रश्नही निकाली काढले जातील, असे शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी सांगितले.
वाशिम : ६६९ शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न निकाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 5:20 PM