वाशिम : राहुल गांधींची खासदारी रद्द, काँग्रेस आक्रमक, संकल्प सत्याग्रह आंदोलन
By संतोष वानखडे | Published: March 26, 2023 02:19 PM2023-03-26T14:19:33+5:302023-03-26T14:19:33+5:30
वाशिम जिल्ह्यातही संकल्प सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले.
वाशिम : काॅंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर देशभरामध्ये काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातही संकल्प सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले.
वाशिम येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी १ वाजता काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या उपस्थितीत संकल्प सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात झाली असून, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा व मानोरा शहरातही आंदोलन करण्यात आले. मोठ्या ख्येने काँग्रेस कार्यकर्ते पेंडॉलमध्ये बसले आहे. खासदार राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई ही सुडबुद्धीने केली असून, याचा निषेध काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी नोंदविला.
सदस्यत्व रद्द केल्याने, देशात हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी प्रदेश महासचिव ॲड. दिलीपराव सरनाईक, जि.प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांच्यासह राजू चौधरी, दिलीप देशमुख, गजानन गोटे, किसनराव मस्के, महादेवराव सोळंके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.