ऑनलाइन लोकमतवाशिम,दि. 3 - नागरिकांना विनाविलंब सेवा मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मात्र, वाशिमची प्रशासकीय कार्यालये यास अपवाद ठरत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह इतर विभागांमध्ये कार्यरत सुमारे १५० कर्मचारी अकोला-वाशिम 'अपडाऊन' करित असून सकाळी ११ आणि सायंकाळी ५.३० च्या सुमारास या कर्मचाऱ्यांची वाशिमच्या रेल्वेस्थानकावर अक्षरश: भाऊगर्दी होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अकोला येथून दररोज सकाळी ९.३० ची 'इंटरसिटी एक्सप्रेस' सुटत असून ती वाशिम येथे ११ वाजता पोहचते. याच रेल्वेने प्रवास करून 'अप-डाऊन' करणारे हे कर्मचारी ११.३० च्या दरम्यान कर्तव्यावर हजर होतात. वास्तविक पाहता कार्यालयात येण्याची वेळ नियमानुसार ०९.४५ ची आहे. यायोगे सदर कर्मचारी तब्बल एक ते दीड तास उशीराने कर्तव्यावर हजर होत आहेत. तसेच कार्यालय सोडण्याची वेळ नियमानुसार सायंकाळी ५.३० ची असताना वाशिमवरून अकोला येथे जाणाऱ्या 'इंटरसिटी एक्सप्रेस'ची वेळ मात्र ४.३० ची असल्याने सायंकाळी देखील काही कर्मचारी १ तास आधीच कर्तव्याला दांडी मारत आहेत. यामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबत असून सर्वसामान्य नागरिकांची देखील गैरसोय होत आहे. नियोजित वेळेपेक्षा उशिराने कर्तव्यावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जात आहे. ह्यबायोमेट्रीकह्ण यंत्राचीही दैनंदिन तपासणी केली जात असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या गर्दीने गजबजतेय वाशिमचे रेल्वेस्थानक!
By admin | Published: January 03, 2017 5:38 PM