लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड: तालुक्यातील बेलखेड येथील धान्य दुकानदाराने लाभार्थी नसलेल्या व्यक्तीची यादी तहसिल कार्यालयाकडे देऊन शासनाची दिशाभूल करून अंत्योदय, बी.पी.एल. व पांढर-या शिधापत्रिका तयार करून घेतल्याची तक्रार तहसीलदारांकडे १९ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशीसह संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई करण्याची मागणीही तक्रारकर्त्याने केली आहे. कारंजा तालुक्यातील पांडुरंग चिमनकर यांनी तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, अंत्योदय कार्ड धारक माधुरी भेंडे, वैशाली गायकवाड, शालिनी हटकर व बि.पी.एल शिधापत्रिकाधारक शांताबाई सूर्यभान साउत या चारही महिला अस्तिवात नसताना. बेलखेड येथील स्वस्त धान्य दुकानदार या महिलांच्या नावे असलेल्या शिधापत्रिकांवर धान्याची उचल करीत आहे, तसेच गावातील एकाच व्यक्तीच्या नावे बीपीएलचे दोन, तर ९१ लाभार्थ्यांच्याा नावावर एपीएल आणि अंत्योदय अशा दोन दोन शिधापत्रिका आहेत. या प्रकरणात केवळ स्वत धान्य दुकानदार जबाबदार नसून, शासकीय यंत्रणेचा ढिसाळपणाही त्यास कारणीभूत आहे. ५० लाभार्थ्यांच्या नावे दोन शिधापत्रिका असल्याचे डी-१ रजिस्टरमधील नोंदवरून स्पष्टही होत आहे. त्यामुळे या शिधापत्रिकावरील धान्य प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळाले की, स्वस्त धान्य दुकानदाराने गैरप्रकार केला, याची चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकारामुळे स्वस्त धान्य दुकानराने शासनाची फसवणुक केल्याचे दिसत आहे. त्यामुळे चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारकर्ते पांडुरंग चिमनकर यांनी आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी वाशिम व संबधित अधिका-यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
- स्वत: धान्य दुकानदार शरद वानखडे यांचे बंधू किशोर वानखडे हे मंगरूळपीर येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असून त्यांच्या नावाने सुध्दा यादी क्रमांक ४५ मधील २३८४३५ एपीएल क्रमांकांची शिधापत्रिका, तसेच इतर एका क्रमांकाची पांढरी शिधापत्रिकाही आहे. धनाढ्य कुटुंबातील प्रमुखाच्या नावाने दोन दोन शिधापत्रिका असताना गोरगरीब जनतेला मात्र एकाच शिधापत्रिकेसाठी व हक्काच्या स्वस्तधान्यासाठी झगडावे लागते.
बेलखेड येथील स्वस्तधान्य दुकानांतर्गत काही बनावट शिधापत्रिका असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणी चौकशी करून लाभार्थ्यांचे बयाण नोंदवून घेण्यात येत आहे. यामध्ये स्वस्तधान्य दुकानदार दोषी आढळल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येईल. - सचिन पाटील, तहसिलदार, कारंजा