लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन यांच्या अहवालानुसार स्थानिक नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस.एल.पानझाडे यांनी पदावर कार्यरत असताना कामकाजात गंभीर स्वरूपात अनियमितता केल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश नगर विकास विभागाने ५ फेब्रुवारीला पारित केला. याप्रकरणी जिल्हा परिषद सभापती विश्वनाथ सानप, संतोष राजाराम भांदुर्गे यांनी तक्रारी केल्या होत्या, हे विशेष.यासंदर्भातील आदेशात पुढे नमूद आहे, की निलंबन कालावधीत मुख्याधिकारी पानझाडे यांचे मुख्यालय मुख्यालय वाशिम येथे राहील व जिल्हाधिकार्यांच्या पुर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबन कालावधीत पानझाडे यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम १६ मधील तरतुदीनुसार कुठेही खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. असे आढळल्यास गैरवर्तणुकीबाबत त्यांना दोषी समजण्यात येवून निर्वाहभत्ता मिळण्याचा हक्क ते गमावतील. याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार कोणत्याही वरिष्ठ प्राधिकार्यावर राजकीय अथवा बाह्य स्वरूपातील दबाव आणता येणार नाही. असा काही प्रकार आढळल्यास नियमाचे उल्लंघन झाल्याचे गृहित धरून त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पानझाडेंची विभागीय चौकशी सुरू!रिसोड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असताना एस.एल.पानझाडे यांनी गंभीर स्वरूपातील अनियमितता केल्याचा ठपका ठेवून पानझाडे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ च्या नियम ८ नुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे नगर विकास विभागाने ५ फेब्रुवारीला पारित केलेल्या आदेशात नमूद केले.