वाशिम : ज्या शेतक-यांनी विमा काढला अशा शेतक-यांना पीक विम्याचे पैसे देण्यास टोलवाटोलवी करणा-या बँक व्यवस्थापकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनवर धडक देवून तक्रार दाखल केली. तसेच येत्या दोन दिवसात शेतक-यांना पिकविम्याचे पैसे न मिळाल्यास शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारासुद्धा दिला आहे. यावेळी शिवसेना शेतक-यांच्या पाठीशी असून शेतक-यांना पिकविम्याचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य डॉ सुभाष राठोड यांनी कारंजा तालुक्यातील उपस्थित शेतक-यांना दिले. शिवसेनेचे वाशिम जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांच्या आदेशावरून कारंजा तालुका व शहर शिवसैनिकांच्या वतिने शेतक-यांची बैठक येथील विश्रामगृहात आयोजित केली होती, त्याप्रसंगी डॉ राठोड यांनी शेतक-यांशी विविध विषयांवर चर्चा केली . कारंजा- मानोरा तालुक्यातील ज्या शेतक-यांना पिकविमा मिळाला नाही त्यांनी संबधीत बँकेचे नाव शिवसेनेच्या शाखा प्रमुखाकडे देण्याचे आवाहन देखील याप्रसंगी डॉ . राठोड यांनी केले.
या बैठकीनंतर वाशिम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या पत्रानुसार संबंधीत बँक शाखा व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हा नोंदविण्याकरिता कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार तर तहसीलदारांना निवेदन दिले. याप्रसंगी शिवशेनेचे कारंजा तालुकाप्रमुख नरहरी कडू, नगरसेवक प्रमोद गायकवाड, युवासेना प्रमुख विकास बांडे, उपशहरप्रमुख कन्हैया ठाकुर, अनिलदादा जाधव ,गजानन टोम्पे, विभाग प्रमुख गणेश येंदे, पवन गुल्हाणे, संदीप राठोड, श्याम पाटील भगत, ज्ञानेश्वर ठाकरे, डिगांबर सुपलकर, नारायण पिसे, चंदु वेरूळकर, तुळशीराम हटकर ईत्यादी शिवसैनिकासह शेतकरी उपस्थित होते.