- नंदकिशोर नारेवाशिम - राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे. असाच शनिवार २६ ऑगस्ट रोजी पाहायला मिळाला. यात रिसोड आगारातून निघालेल्या शिवशाही बसचे ॲक्सल तुटल्याने समोरचे चालकाच्या बाजुचे चाक निखळून चक्क २०० फुट अंतरावर शेतात जाऊन पडले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मात्र बसमधील ४० प्रवाशांचे प्राण वाचले.
रिसोड आगाराची रिसोड-संभाजीनगर ही एमएच ४०, वाय ५६१३ क्रमांकाची शिवशाही बस सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास संभाजीनगरकडे निघाली. ही बस अवघ्या २० किलोमीटर अंतरावर जाताच लोणी गावानजिक बसचे समोरील ॲक्सल तुटून चुराडा झाला आणि चालकाच्या बाजुचे चाक निखळून चक्क २०० फुट अंतरावर शेतात जाऊन पडले. दरम्यान, चालक संतोष खडसे, वाहक देवकर यांना या घटनेचा गंध येताच त्यांनी बसचा वेग नियंत्रित केला होता. त्यामुळे मोठा अपघात टळून बसमधील ४० प्रवाशांचे प्राण वाचले. त्यांनीसतर्कता दाखवली नसती, तर थोड्याच अंतरावर मोठा अपघात घडून जिवित हानी झाली असती. यापूर्वीही रिसोड आगारातील शिवशाही बसने बुलडाणा जिल्ह्यातील सुलतानपूरनजिक पेट घेतला होता. त्यावेळीही चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली होती.
रिसोड आगाराचा भोंगळ कारभारयेथील आगारप्रमुखांची प्रशासनावर पकड नसून यापूर्वीही भंगार बसमुळे अपघाताच्या शक्यता उद्भवल्या होत्या. रिसोड आगाराच्या बस इतर आगाराला दिल्याने तालुक्यातील विद्यार्थी, इतर प्रवाशांचे हाल होत असल्याचे प्रकार अनेकदा ऐकायला मिळतात. विभाग नियंत्रकांनी रिसोड आगाराच्या बस तात्काळ परत करून रिसोड तालुक्यातील प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी प्रवाशीवर्गातून होत आहे.
मी रिसोड येथून जालना येथे शिवशाही बसने प्रवास करीत होतो. बसमधील आसन व्यवस्था सुयोग्य नव्हती, तसेच प्रथोमपचार पेटीही नव्हती. अशातच लोणी गावाजवळ या बसचे समोरचे चाक निखळून शेतात जाऊन पडले; परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे आमचे प्राण वाचले.- सिताराम किसन सावसुंदर (प्रवासी, रत्नापूर)
रिसोड आगारातील एमएच ०९, ईएम २११९ क्रमांकाची बस ही कालच अकोला येथील कार्यशाळेतून दुरुस्त होऊन आली. त्यानंतरही एका बससोबत अशी दुर्घटना घडली. या संदर्भात वरिष्ठांना कळविण्यात येईल, तसेच रिसोड आगाराच्या दोन साध्या बस विभाग नियत्रकांनी इतर आगाराला दिल्याने शिवशाही बस वापराव्या लागत आहेत.- एस. ए. दराडे,(आगार प्रमुख, रिसोड)