लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पारंपरिक पद्धतीने पुरविल्या जाणा-या विजेवरील ताण कमी करून कृषी पंपांना दैनंदिन सलग १२ तास वीज मिळावी, यासाठी शेतकºयांचे कृषी पंप सौरऊर्जेशी जोडण्याकरिता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार, मांगुळ झनक (ता.रिसोड) येथे सौरऊर्जा पॅनेल उभारले जाणार असले तरी ही प्रक्रिया अगदीच संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गत शेतकºयांचे सामूहिक गट तयार करून त्यांच्या कृषी पंपांना स्वतंत्र सौर वाहिनीद्वारे सकाळी ६ ते सायंकाळी ६ असे सलग १२ तास वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच वीज बचत करणारे कृषी पंप ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. यामुळे वीज बचतीसोबतच शेतकºयांचा विजेवर होणारा खर्च कमी होण्यास मदत मिळणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील मांगुळ झनक येथे सौरऊर्जा पॅनेल आस्थापित केले जाणार असून, त्याठिकाणी सौर वाहिनीद्वारे वीज पुरवठा करून तो इतर ठिकाणच्या उपकेंद्रांकडे वर्ग केला जाणार आहे. यासंदर्भात महापारेषणच्या चमूने मांगुळ झनक येथील जागेची पाहणी केली आहे; मात्र त्याउपर विशेष हालचाल झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी भरीव निधीची गरजवाशिम जिल्ह्यातील वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी भरीव निधीची गरज असून, जिल्ह्यातील अतिभारीत वीज यंत्रणेच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी विद्युत उपकेंद्र व रोहित्रांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे; मात्र याकडे सध्यातरी शासनाचे लक्ष नाही. याशिवाय पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेज परिसरातील कृषी पंपांना वीज जोडण्याचा प्रश्नही प्रलंबित असून, यासाठी शासनाकडे पाठविण्यात आलेल्या ९५ कोटी रुपयांच्या प्रस्तावास अद्याप मंजुरात मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गत मांगुळ झनक येथील एक ते दीड किलो मीटरच्या परिसरात सौरऊर्जा पॅनेल उभारले जाणार असून, महापारेषणच्या चमूकडून त्याचे सर्वेक्षणदेखील झाले आहे. महावितरणच्या सात उपकेंद्रांवर या माध्यमातून साधारणत: १ मेगावॅट वीज उपलब्ध करून देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्याचेही काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल.- आर.के.गिरीकार्यकारी अभियंता, महावितरण