लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पार्डी तिखे ता. रिसोड येथील ग्रामपंचायतच्या विशेष सभेसाठी ग्राम पंचायत कार्यालयाचे कुलूप शिपायाने उघडले नसल्याचे पाहून सरपंच व ग्रामसेवकांनी सदस्य, पोलीस पाटलांच्या समक्ष कुलूप तोडून ३ फेब्रुवारीला विशेष सभा घेतली. ३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता पार्डी तिखे ग्रामपंचायतची विशेष सभा असल्याची पूर्वसूचना ग्रामसेवक एस. के. काठोळे यांनी २५ जानेवारी रोजी दिली होती. त्या अनुषंगाने ३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता सरपंच शेषराव दगडूजी अंभोरे, ग्रामसेवक काठोळे, सदस्य, सदस्यांचे प्रतिनिधी सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आले असता, शिपायाने कुलूप उघडले नसल्याचे आढळून आले. पोलीस पाटील आर.के. तिखे, सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांच्या उपस्थितीत कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर विशेष सभेला सुरूवातीला झाली. या सभेत काही महिला सदस्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्यासाठी आले असता, सरपंच व ग्रामसेवकांनी या प्रतिनिधींना विनंती करून विशेष सभेला केवळ सदस्यांनाच पाठवावे, असे सांगितले. यावरून काही वेळ गोंधळ झाल्याची माहिती आहे. त्यानंतर सरपंच शेषराव अंभोरे, उपसरपंच पदमाबाई अंभोरे, ग्रामसेवक एस.के. काठोळे व काही सदस्यांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. घरकुल योजना, १४ वा वित्त आयोगाचा निधी, शासनाच्या विविध योजना यासह गावविकासाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.