लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात आजपर्यंत तालुका क्रिडा संकुलच उभारले गेले नाही. अन्य तालुक्यांमधील तालुका क्रिडा संकुलाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मिळाला असतानाही विकासकामे प्रलंबित असण्यासह मैदानांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे प्रतिभावंत खेळाडूंची सुसज्ज मैदानांअभावी गैरसोय होत आहे.ग्रामिण भागातील प्रतिभावंत मुलांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी त्रिस्तरीय धोरण आखून विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर क्रिडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र वाशिम जिल्ह्यात यासंदर्भातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून वाशिम येथे तालुका क्रिडा संकुलासाठी लागणाऱ्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव या पाच तालुक्यांमध्ये असलेल्या क्रीडा संकुलांच्या विकासासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाकडून तालुका क्रिडा संकुल समित्यांकडे वर्ग करण्यात आला; मात्र रिसोड येथील जागा अतिक्रमणात अडकलेली असून नागरतास (ता.मालेगाव) येथील क्रिडा संकुलाची दैनावस्था झालेली आहे. मानोरा क्रीडा संकुलाच्या संरक्षण भितींची पडझड होण्यासह मैदानावर खेळाडूंसाठी कुठल्याच सुविधा नाहीत. मंगरूळपीर आणि कारंजाची स्थिती बºयापैकी असली तरी सुविधांचा अभाव आहे.
रिसोडात अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवररिसोड येथे तालुका क्रिडा संकुलाच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाले आहे. ते हटवून क्रिडा संकुल उभारण्यास प्रशासनाला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. क्रिडा संकुलास मिळालेल्या ११ एकर जागेची दोनवेळा मोजणे झाली. तसेच संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाचे टेंडर होऊन कंत्राटदारही नियुक्त करण्यात आला; मात्र अतिक्रमणामुळे काम सुरू झालेले नाही.
वाशिममध्ये तालुका क्रिडा संकुल उभारण्याकरिता वाशिम-रिसोड रस्त्यावर जागा मिळाली आहे. त्याचे काम येत्या काही दिवसात मार्गी लागेन. रिसोडमध्ये अतिक्रमणाचा प्रश्न सुटलेला नाही. मालेगावमध्ये संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होवून इतर कामे सुरू आहेत. मंगरूळपीर व कारंजाची स्थिती चांगली असून मानोराकडेही लक्ष दिले जाईल.- प्रदिप शेटियेजिल्हा क्रिडा अधिकारी, वाशिम