वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेत जमिनींच्या पुनर्शोधन कार्यक्रम वाशिम जिल्ह्याने पूर्ण केला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने एकूण ८०९ गावांचे काम शुक्रवार २८ सप्टेंबर रोजीच पूर्ण केले आहे.
राज्य शासनाच्यावतीने आॅनलाईन कामकाज पद्धतीवर भर देण्यात येत असून, या अंतर्गत सर्वच कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेत जमिनींच्या सातबारांचे संगणकीकरण करून पुनर्शोधन प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता अकृषक झालेल्या जमिनींच्या सातबारांची पुनर्शोधन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार एकूण ८०९ गावांमधील अकृषक शेतजमिनींचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा वाशिम हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. यापूर्वी शेत जमिनींच्या सातबारा पुनर्शोधनातही वाशिम जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून महसूल प्रशासनाकडून प्रशस्तीपत्रक मिळविले होते. यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह जिल्हा विज्ञान आणि सूचना अधिकारी सागर हवालदार यांच्या मार्गदर्शनात महसूल प्रशासनाच्या सर्वच अधिकारी कर्मचाºयांनी अथक परिश्रम घेतले आहेत.