वाशिम शहर हे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तालुकास्तरीय विविध कामांसाठी ग्रामीण भागांतील लोकांची येथे सतत ये-जा सुरू असते, तर जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने इतर तालुक्यांतील नागरिकांसह परजिल्ह्यातील नागरिकांचीही येथे दरदिवशी ये-जा सुरू असते. याच कारणामुळे वाशिम शहरात दिवसभर वर्दळ सुरू असते. हा प्रकार कोरोना संसर्ग पसरण्यासाठी पोषक आहे. जिल्ह्यात गत चार दिवसांत १९३१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात एकट्या वाशिम तालुक्यातील ४७२ व्यक्ती असून, चार दिवसांत आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास २५ टक्के आहे. अर्थात जिल्ह्यात वाशिम तालुका कोरोना संसर्गाच्या प्रमाणात आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे.
-----
ग्रामीण भागांतील स्थिती गंभीर
वाशिम शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहेच, शिवाय ग्रामीण भागांतही कोरोना संसर्गाचा कहर सुरू असून, २६ मार्च ते २९ मार्चदरम्यान तालुक्यात आढळलेल्या ४७२ कोरोनाबाधितांपैकी १६८ व्यक्ती ग्रामीण भागातील आहेत. त्यात अनसिंग, पिंपळगाव, अडोळी यासारख्या गावांत गत चार दिवसांत मोठ्या प्रमाणात व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढला असून, गावागावांत कोरोना चाचण्यांना वेग देण्याचे काम त्यांना करावे लागत आहे.
-------
ग्रामसमित्यांची जबाबदारी वाढली
ग्रामीण भागांत वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागांत सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तर समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागांत वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तातडीने चाचणी करण्यासह विलगीकरणातील व्यक्तींवर लक्ष ठेवण्याच्या त्यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.