लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २०१९ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने आतापासूनच काही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने विहिर अधिग्रहणासाठी चाचपणी सुरू केली आहे. पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही तसेच पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्प आणि भूजल पातळीतही समाधानकारक वाढ होऊ शकली नव्हती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हिवाळ्यातच काही गावांत पाणीेटंचाई निर्माण झाली. पाणीटंचाईग्रस्त गावांत उपाययोजनेचा एक भाग म्हणून विहिर अधिग्रहण केले जाणार आहे. टंचाईग्रस्त गावांत प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना यापूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह पंचायत समिती प्रशासनाला दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आता टंचाईग्रस्त गावांत विहिर अधिग्रहण करण्यासाठी प्रशासनातर्फे चाचपणी केली जात आहे. एकूण ४०० विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. विहिर अधिग्रहीत केल्यानंतर तेथे ‘अधिग्रहित विहिर’ असा फलक लावण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे यांनी केल्या. अधिग्रहित विहिरीवरून संबंधित गावाला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासनातर्फे केला जाणार आहे. संबंधित गावात ज्या विहिरीत मुबलक जलसाठा आहे, अशी विहिर अधिग्रहित करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. विहिर अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
वाशिम : विहिर अधिग्रहणासाठी चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:10 PM