- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशभरासह ‘कोरोना व्हायरस’च्या धास्तीचे लोण वाशिम जिल्ह्यातही पसरले आहे. दरम्यान, या ‘व्हायरस’ची बाधा झालेला एकही रुग्ण अद्याप वाशिम जिल्ह्यात आढळलेला नाही. असे असले तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यानुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात संशयित रुग्णांवर उपचारासाठी विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून सोमवार, ९ मार्चपासून जिल्हाभरात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.‘कोरोना’बाबत विविध माध्यमातून झळकणाऱ्या बातम्यांमुळे वाशिम जिल्ह्यातही भितीचे वातावरण पसरले आहे; मात्र या ‘व्हायरस’ची बाधा लागण झालेला रुग्ण संपर्कात आल्याशिवाय होत नाही आणि सुदैवाने अशात वाशिम जिल्ह्यात परदेशातून परतलेली एकही व्यक्ती नाही. त्यामुळे जिल्ह्यात ‘कोरोना व्हायरस’ची बाधा होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे डॉ. आहेर म्हणाले. नागरिकांनी देखील चुकीच्या पद्धतीने पसरविल्या जाणाºया कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता वैयक्तिक स्वच्छतेसंबंधीची खबरदारी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले.‘कोरोनो’संबंधी खबरदारी म्हणून वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांसोबतच इतरही आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ‘व्हेंटीलेटर’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक, आयुक्तांकडून नियमित ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’ तथा पत्रव्यवहारांव्दारे मिळणाºया सूचनांचे पालन करून ‘कोरोना’पासून जिल्हा सुरक्षित ठेवण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी दिली. सोमवारपासून यासंबंधी जिल्हाभर जनजागृती मोहीमेस सुरूवात केली जाणार आहे.
१४ विदेशवाºया रद्द; प्रादेशिक प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण घटले!कोरोनाच्या धास्तीचा परिणाम विविध क्षेत्रांवर जाणवत आहे. त्यानुसार, वाशिममधील ‘टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात नियोजित १४ विदेशवाºया रद्द झाल्या आहेत. यासह प्रादेशिक प्रवास करणाºयांचे प्रमाणही घटले आहे, अशी माहिती टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक रवि बुंधे आणि निखील नांदगांवकर यांनी दिली.