लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: ‘लॉकडाऊन’ आणि जिल्हा सीमाबंदीनंतरही मंगरुळपीर येथून ३० मार्च रोजी राजस्थानचे ७४ कामगार घेऊन जात असलेल्या ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र ट्रकचा चालक फरार होऊन मध्यप्रदेशातील इंदोर येथे गेला आणि २० एप्रिल रोजी रात्री पुन्हा मंगरूळपीर येथे परत आला. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले; परंतु सदर ट्रकचालक तेथूनही फरार झाल्याचा गंभीर प्रकार घडला या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला पकडण्यात आले.कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी शासनाने सर्वच जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. त्यात ३० मार्च रोजी मंगरुळपीर येथून राजस्थानकडे ७४ कामगार घेऊन जात असलेला ट्रक पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी पकडला. ट्रॅकमधील चालक आणि ७४ कामगारांना स्थानिक जिल्हा परिषद शाळेत ठेवत प्रशासनाने त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली. दरम्यान, या ट्रकच्या चालकाने फरार होऊन थेट मध्यप्रदेशातील इंदोर गाठले; परंतु संबंधित ट्रकमालकाने त्याला परत पाठवून कोणत्याही परिस्थितीत ट्रक परत घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर हा चालक लॉकडाऊन, जिल्हा सीमाबंदीतही थेट पुन्हा मंगरुळपीर येथे पोहोचला. ही बाब उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामीण रूग्णालयात त्याची तपासणी केली असता त्याला ताप असल्याचे आढळून आले. दरम्यान, परजिल्ह्यातून आल्यामुळे त्याच्यावर पालिका प्रशासन, पोलिसांनी कारवाई करीत वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आता हा ट्रकचालक जिल्हा सामान्य रुग्णालयातूनही फरार झाला. या संदर्भात पोलिसांना रूग्णालयाने माहिती दिल्यानंतर त्याला शोधून पकडण्यात आले. तथापि, या सर्व प्रकारामुळे जिल्हा सीमाबंदी आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. नर्सिंग कॉलेजमध्ये ठेवले विलगीकरणातवारंवार पलायन करण्यात यशस्वी होणाºया ट्रकचालकाची गंभीर दखल पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने घेतली असून, त्याला आता नर्सिंग कॉलेजमधील एका स्वंतत्र कक्षात कडेकोट पहाºयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
वाशिम: ‘तो’ ट्रकचालक जिल्हा सामान्य रुग्णालयातूनही फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 5:43 PM