शिरपूर (वाशिम) - वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूर येथे आहेत. मे- जून २०१७ मध्ये ४०२ शेतक-यांनी १७६ हेक्टरमध्ये हळदीची लागवड केली होती. या हळदीच्या काढणीस प्रारंभ झाला आहे. ज्या शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी हळदीची लागवड परिसरात दरवर्षी करतात. मागील वर्षी ४७०० रुपये क्विंटल हळदीला कमी दर मिळाल्याने व पाऊस कमी झाल्याने हळद लागवड करणा-या शेतक-याची संख्या काही प्रमाणात परिसरात घटलेली दिसून आली. शिरपुरात शेकडो शेतकरी स्पर्धात्मक हळदीची शेती करीत असून मागील ७ ते ८ दिवसापासुन हळद काढणीला सुरुवात झाली आहे. सध्या राजुभाऊ देशुमख, गणेश इरतकर यांच्या शोतील हळद काढणीचे काम पूर्णत्वाकडे आले असुन इतरही हळद उत्पादक शेतकरी व मजुरांची लगबग सुरू आहे.