मंगरूळपीर (वाशिम) : तालुक्यातील वनोजा शेतशिवारातून गेलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील सर्व्हिस रोडवर गौणखनिजाची वाहतूक करणाºया भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात शैलेश विठ्ठल चांभारे (वनोजा) हा २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला. ही घटना ८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, शैलेश चांभारे हा ८ जानेवारी रोजी सकाळी समृद्धी महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून दुचाकी वाहनाने शेतात चालला होता. यादरम्यान गौण खनिज (मुरूम) वाहतूक करणाºया भरधाव वेगातील वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. त्यात शैलेश जागीच ठार झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, मृतक युवक रस्त्यावर सुमारे १५ ते २० फूट फरफटत गेला. तसेच मोटारसायकलचा पूर्णत: चुराडा झाला.महामार्गाच्या दुतर्फा शेती असणाºयांचा जीव धोक्यातवनोजा शेतशिवारातून गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा शेकडो एकर शेती वसलेली आहे. शेतांमध्ये जाण्याकरिता शेतकºयांना महामार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे संरक्षणात्मक उपाययोजना कराव्या, अशी मागणी प्रशासनाकडे वेळोवेळी करण्यात आली; मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून ८ जानेवारीला याच कारणावरून एकाचा नाहक बळी गेल्याचा सूर उमटत आहे.
पोलिसांच्या मध्यस्तीनंतर मृतदेहाचे शवविच्छेदनसमृद्धी महामार्गावर घडलेल्या अपघातात शैलेश चांभारे हा युवक ठार झाल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी न्यायाची मागणी करत मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. न्याय मिळवून देण्याचा विश्वास देत पोलिसांनी केलेल्या मध्यस्तीनंतर वाद निवळून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.