वाशिम : गत ७ वर्षांपासून शिक्षक पदभरतीचे प्रलोभन दाखवून टीईटी आणि अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांची दिशाभूल चालविली आहे, असा आरोप करीत आता तरी शिक्षक पदभरती लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी भावी शिक्षकांनी मंगळवारी केली.
स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थेमध्ये जवळपास २३ हजार जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी सुरूवातीला टीईटी परीक्षा (शिक्षक पात्रता चाचणी) घेण्यात आली. त्यानंतर एका महिन्यापूर्वी शिक्षक अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. अद्याप शिक्षक भरतीसंदर्भात कोणतीही हालचाल दिसत नसल्याचे पाहून वाशिम जिल्ह्यातील भावी शिक्षकांनी एकत्र येत लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र राज्य डी.एड, बी.एड. स्टुडंट असोसिएशन जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देत राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे शिक्षक पदभरतीची मागणी केली. शिक्षक अभियोग्यता चाचणी होउन महिनाभराचा कालावधी संपत आला असताना पदभरती संदर्भात ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून एका महिन्याच्या आत शिक्षक भरतीची प्रक्रीया करु असे आश्वासन शिक्षण विभागाने दिले होते. अद्याप पदभरती संदर्भात कोणत्याही हालचाली नाहीत. राज्य शासनाने शिक्षक पदभरतीला विलंब केल्यास अगोदरच बेरोजगारीच्या काळोखात जीवन जगणाºया डीएड, बीएड धारकांच्या असंतोषाचा उद्रेक आंदोलनाच्या माध्यमातून होण्याची भीती भावी शिक्षकांनी निवेदनातून व्यक्त केली. दरम्यान ७ वर्षाच्या कालावधीमध्ये कुठलीच पदभरती झाली नसताना केवळ पटसंख्येअभावी राज्यातील १४ हजार शिक्षक अतिरिक्त कसे असा प्रश्न उपस्थित करून शिक्षक पदभरतीत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान वशिलेबाजी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी क्रीडा शिक्षकाचे पदही अभियोग्यता चाचणीतून केंद्रिय पध्दतीने भरण्यात यावे, शिक्षण सेवकांचा कालावधी ३ वर्षाहून कमी करून १ वर्षाचा करावा, शिक्षण सेवकाला ९ हजार वेतन निश्चित करावे, ३० टक्के नोकर कपात करण्यात येऊ नये आदी मागण्या डीएड बीएड स्टुडंट असोसिएशनच्यावतीने करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राम धनगर, आकाश ढोले, रुपेश गोटे, गजानन गोटे, रामहरी भोयर, भागवत गोटे, गणेश गोटे, विजय शेळके, रवींद्र सिरसाट, किसन काळबांडे, सतीश गोटे, साधवी कांबळे, वनिता वाथे, समीर शेख, उमेश सुरुशे, ओम इढोळे, शाम इढोळे, मनोज शिंदे, अनिल शिंदे, रवी शिंदे, अंकुश जाधव, अरुण शेळके, रवी मोपकर, भागवत सावके, अंकुश जाधव, राजकुमार मुळे, श्याम सावंत, अरविंद जाधव आदींची उपस्थिती होती.