चौसाळा (वाशिम ): प्रशासनाचा ढीसाळ नियोजनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून चौसाळा येथील पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे गावातील लोक २ किलोमीटर अंतरावरून पाणी आणून गरज भागवित असून, या प्रकाराला ते वैतागले आहेत. यामुळे येत्या ४ मार्चपर्यंत पाणी पुरवठा न केल्यास कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा त्यांनी मानोरा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
मानोरा तालुक्यातील चौसाळा येथे अडाण प्रकल्पावरील १६ गावे पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी ती फुटून पाणी पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते. या पृष्ठभूमीवर गेल्या दोन महिन्यांपूर्वी लाखो रुपयांच्या मंजुरीनंतर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे चौसाळा येथे या योजनेतून होत असलेला पाणी पुरवठा बंद झाला असून, ग्रामस्थ शेतशिवारात दोन किलोमीटर पायपीट करीत डोक्यावर पाणी आणून गरजा भागवित आहेत. या त्रासाबाबत अधिकाºयांना माहिती दिली आणि कंत्राटदाराकडेही काम लवकर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तथापि, त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पाण्यासाठी सुरू असलेल्या वणवण भटकंतीला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांनी याबाब मानोराच्या तहसीदारांकडे निवेदन सादर करीत येत्या ४ मार्चपर्यंत ही पाणी पुरवठा योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याची दखल न घेतल्यास ५ मार्च रोजी गावातील प्रत्येक व्यक्तींच्या सहभागाने कारंजा-मानोरा मार्गावर रास्तारोको करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला असून, यामुळे होणाºया परिणामास प्रशासन जबाबदारा राहणार असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.