लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. जिल्हयात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी व विनाकारण फिरल्याप्रकरणी पोलीस विभागाने ४३० वाहने जप्त केली असून वाहनधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत.कोरोना विषाणुबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या वेळा सकाळी ८ ते १२ पर्यंत केल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिक दुपारी १२ वाजतानंतर विनाकारण गर्दी करताना दिसत आहेत. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असून वाहने जप्त करण्याचा सपाटा लावल्याने शहरात रिकामे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी व सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी स्वत: रस्त्यावर येऊन ही धडक कारवाई करून नागरिकांना लॉकडाऊनचे नियम पाळत घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.कोरोना विषाणु संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतिने प्रत्येक चौकाचौकात कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्यावतिने रस्त्यावरुन जाणाºया प्रत्येक नागरिकांची चौकशी केल्या जात आहे. यामध्ये काहीही काम नसतांना फिरणाºयांवर कारवाई केली जात आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी या विषाणुचे गांभीर्य समजून घेऊन घरातच राहणे आवश्यक आहे. यासंदर्भात वारंवार जनजागृती करुनही अनेक जण याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्याने पोलीस विभागाच्यावतिने काहीही काम नसतांना रस्त्यावर फिरणाºयांची वाहने जप्त व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यानंतरही काहींनी न ऐकल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्याकरिता नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.- वसंत परदेसी,पोलीस अधीक्षक, वाशिम