लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांसह ग्रामीण भागात सद्या ‘व्हायरल फिव्हर’चा (साथीचे आजार) अक्षरश: प्रकोप झाला असून सर्दी, ताप आणि खोकल्याच्या त्रासाने रुग्ण हैराण झाले आहेत. दरम्यान, गत काही दिवसांपासून खासगी व शासकीय रुग्णालयांमधील ‘ओपीडी’त सुमारे ३० टक्क्याने वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही विविध स्वरूपातील किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असताना ‘व्हायरल फिव्हर’नेही तोंड वर काढले आहे. यात प्रामुख्याने सर्दी, ताप आणि खोकला यासारखे आजार जडत असून प्रत्येक घरामध्ये हा त्रास असलेला किमान एक तरी रुग्ण आढळून येत आहे. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसोबतच जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांमधील रुग्णसंख्येत यामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
चिमुकल्यांवर विशेष परिणामजिल्हाभरात साथीच्या आजारांनी तोंड वर काढले असून सर्दी, खोकला आणि तापेमुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. त्याचा विशेष परिणाम चिमुकल्यांवर झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, जिल्हा सामान्य रुग्णालयासह अन्य शासकीय रुग्णालये व खासगी बाल रुग्णालयांमध्येही दैनंदिन तोबा गर्दी होत आहे.
‘व्हायरल फिव्हर’मुळे गत काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्दी, खोकला आणि तापेने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यासह मलेरिया, डेंग्युसदृश आजार , न्युमोनिया, टायफॉइड, डायरिया आदी आजारांमधील रुग्णही आढळून येत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्याचे सर्वंकष प्रयत्न सुरू असून पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी.- डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम