- संतोष वानखडेवाशिम - पतीचा गळा आवळून पत्नी व मुलाने खून केल्याचे सिद्ध झाल्याने मंगरूळपीर येथील विद्यमान अतिरीक्त सत्र न्यायालयाने ३० ऑक्टोबर रोजी आरोपी पत्नी व मुलास साडेसात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
पोलिस हेड कॉन्स्टेबल शिवदास चव्हाण यांनी १७ जुलै २०१८ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, मृतक गजानन सदाशिव झाटे (रा.कोठारी, ता. मंगरूळपीर) यांचा खून मृतकाची पत्नी शकुंतला गजानन झाटे व मृतकाचा मुलगा राजू गजानन झाटे यांनी दोरीने गळा आवळून केला होता. या फिर्यादीवरून मंगरूळपीर येथे भादंवी कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. बनसोडे यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जी. डी. गंगावणे यांनी एकूण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. परंतु प्रत्यक्ष साक्षीदार मृतकाची मुलगी व गावातील घटना प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार फितूर झाल्याने शासनाची बाजू कमकुवत झाली होती.
या खटल्यात वैद्यकीय अधिकारी, दाखल अधिकारी, तपास अधिकारी व इतर महत्वाचे साक्षदारांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरून व परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपी राजू गजानन झाटे व शकुंतला गजानन झाटे यांनी संगनमत करून मृतकाचा दोरीने गळा आवळून सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले. मंगरूळपीर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. आर. वाघमारे यांनी कलम ३०४ भाग १ प्रमाणे आरोपीला प्रत्येकी ७ वर्षे ६ महिने सश्रम कारावास व प्रत्येकी २ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा दिली तसेच दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या सत्र खटल्यात महाराष्ट्र शासनातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जी. डी. गंगावणे यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरावी म्हणून महिला पोलिस कर्मचारी सुवर्णा मनवर यांनी मदत केली.
आरोपी कारागृहातगुन्हा घडल्यापासून आरोपी हे कारागृहात आहेत. न्यायालयाने त्यांना जामिन मंजूर केला नव्हता. आता विद्यमान न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.