वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा २१ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार असून, यावेळी उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करतील.
अर्थसंकल्पीय सभेच्या पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख राहणार असून, यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनीस, सभापती सर्वश्री विश्वनाथ सानप, पानुताई जाधव, सुधीर पाटील गोळे, यमुना जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे. अर्थ समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे हे सलग चवथ्यांदा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात एखाद्या विभागाला झुकते माप आणि दुसºयावर अन्याय होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी या विभागाला पुरेशा प्रमाणात न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अर्थ समितीचे सभापती ठाकरे यांनी सलग तीन वेळा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावर्षी चवथ्यांदा शिलकीचा अर्थसंकल्प सादर होणार काय? याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये संपुष्टात येणार असल्याने आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुक होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी होण्याची शक्यता आहे. गतवर्षी अर्थसंकल्पीय सभेत काही सत्ताधारी सदस्यांसह विरोधकांनी एकच गदरोळ केला होता. त्यामुळे अर्थसंकल्पीय सभा तहकूक करावी लागली होती. वाशिम जिल्हा परिषदेच्या इतिहासात अर्थसंकल्पीय सभेत पहिल्यांदा अर्थसंकल्प मंजूर झाला नव्हता. गतवर्षीची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आल्याची माहिती आहे.