लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक अविरोध झाल्यानंतर अद्याप सभापतींचे खातेवाटप झाले नाही. दोन सभापती व उपाध्यक्ष यांच्याकडे कोणते खाते सोपविले जाते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.वाशिम जिल्हा परिषदेत एकूण ५० सदस्य संख्या असून, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १२ सदस्य निवडून आले. राकाँंने जिल्हा परिषद निवडणूकीचे सूत्रे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्याकडे सोपविली होती. ठाकरे यांनी वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवित सर्वाधिक सदस्य निवडून आणण्याबरोबरच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही राकाँकडे ठेवण्यात यश मिळविले. विषय समितीचे महिला व बालकल्याण सभापती पदही राकाँने अविरोध मिळविले. राकाँ खालोखाल काँग्रेसचे ९ सदस्य असून, उपाध्यक्ष व एक सभापती पद काँग्रेसकडे आले आहे. यापूर्वी उपाध्यक्षांकडे अर्थ व बांधकाम असे दोन महत्वाचे खाते होते. यावेळी शिवसेनेने या खात्यावर दावा केला आहे. त्यामुळे उपाध्यक्षांकडे कोणते खाते सोपवावे, यावर महाविकास आघाडीमध्ये चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. समाजकल्याण सभापतीपदी भारीप-बमसंच्या वनिता देवरे तर महिला व बालकल्याण सभापती पदी राकाँच्या शोभा गावंडे यांनी सूत्रे स्विकारली आहे. दोन विषय समिती सभापती म्हणून काँग्रेसचे चक्रधर गोटे व शिवसेनेचे विजय खानझोडे यांची अविरोध निवड झालेली आहे. शिक्षण व आरोग्य तसेच कृषी व पशुसंवर्धन या दोन विषय समित्यांवर कुणाची वर्णी लावायची, याचा निर्णय अद्याप झाला नाही. अर्थ व बांधकाम खाते शिवसेनेकडे दिले तर उपाध्यक्षांकडे शिक्षण व आरोग्य खाते सोपवायचे की तुलनेने कमी महत्वाचे असलेले कृषी व पशुसंवर्धन खाते सोपवायचे याचा निर्णय अधांतरी आहे. आठ दिवसांपासून उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे व दोन सभापती चक्रधर गोटे, विजय खानझोडे हे कोणत्याही खात्याविना आहेत. खाते नसल्याने कामकाज नेमके कसे करावे, याचाही पेच कायम आहे. येत्या आठ दिवसात खाते वाटप होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्षांचे कक्षही बदलले जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासाठी विशेष कक्षाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत नियोजित कक्षातच जिल्हा परिषद अध्यक्षांनी कामकाज पाहिले आहे. यावेळी प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षांचा नियोजित कक्ष उपाध्यक्षांकडे सोपविला आहे तर तत्कालिन उपाध्यक्ष म्हणून ज्या कक्षातून कामकाज पाहिले, तोच कक्ष अध्यक्ष झाल्यानंतरही चंद्रकांत ठाकरे यांनी कायम ठेवला आहे. उर्वरीत दोन सभापतींच्या कक्ष वाटपाचा प्रश्नही अद्याप कायम आहे.