लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाºयांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी मात्र शिक्षकांच्या संघटनेने शिक्षणविषयक मागण्या प्रलंबित असल्याने या क्रीडा स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. शिक्षक संघटनांनी काढता पाय घेतल्याने कर्मचाºयांच्या अन्य संघटनाही क्रीडा स्पर्धेबाबत उत्सूक नसल्याने यावर्षी स्पर्धा होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे.अधिकारी, कर्मचाºयांच्या क्रीडाविषयक कलागुणांसाठी व्यासपिठ मिळावे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विरंगळा म्हणून दरवर्षी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाºयांच्यावतीने क्रीडा महोत्सव साजरा केला जातो. यावर्षीदेखील क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, या बैठकीला सुरूवात होण्यापूर्वीच शिक्षक संघटनेने शिक्षकांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करीत या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला. या निर्णयामुळे क्रीडा स्पर्धेच्या आयोजन प्रक्रियेत व्यत्यय निर्माण झाला आणि ही बैठक पुढे कोणत्याही निर्णयाप्रत येऊ शकली नाही. जिल्हाभरात तीन हजारापेक्षा अधिक संख्येने असलेले शिक्षक या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नसल्याने क्रीडा स्पर्धा होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. आतापर्यंत क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात कुणीही पुढाकार घेतला नसल्याने बैठकही झाली नाही. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कर्मचाºयांनी पुढाकार घेतला तर स्पर्धेचे आयोजन केले जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे आता पुढाकार कोण घेणार? हा महत्वाचा प्रश्न असून, कर्मचाºयांच्या पुढाकारावरच क्रीडा स्पर्धेचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे बोलले जात आहे.
कर्मचारी संघटनेच्या वादात अडकल्या वाशिम जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 2:07 PM