लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाची निवडणूक अविरोध झाल्यानंतर, १५ फेब्रुवारी रोजी सभापतींचे खातेवाटप करण्यात आले. त्यात उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांना कृषी व पशुसंवर्धन, चक्रधर गोटे यांना शिक्षण व आरोग्य; तर विजय खानझोडे यांना अर्थ व बांधकाम सभापतीपद मिळाले. दरम्यान, ऐनवेळी अडचणी उद्भवल्याने विषय समिती सदस्यांच्या निवडी लांबणीवर पडल्या.वाशिम जिल्हा परिषदेत एकूण ५० सदस्य संख्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १२ सदस्य आहेत. त्याखालोखाल काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजपा ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण सभापतीपदी शोभा गावंडे व समाजकल्याण सभापतीपदी वनिता देवरे यांची यापुर्वीच निवड झाल्यानंतर उर्वरीत दोन विषय समिती आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे खाते वाटप प्रलंबित होते. ती प्रक्रिया ठरल्यानुसार शनिवारी पार पडली; मात्र विषय समितीत सदस्यांचा समावेश करण्यासंबंधी सकाळी ११ वाजतापर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, जनविकास आघाडी, भाजपा, भारिप बमसंच्या सदस्यांनी अर्ज सादर केले. वेळेनंतर काँग्रेस व शिवसेना सदस्यांचे अर्ज येत असल्याचे पाहून त्यास जनविकास आघाडी, भाजपा सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे समिती सदस्यांची निवड प्रक्रिया रखडली आहे.अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य अशा पाच समित्यांमध्ये जवळपास ७ ते १० सदस्य राहतात. या पदासाठी अर्ज भरणाऱ्या सदस्यांमधून समिती सदस्यांची निवड केली जाणार होती; मात्र ही प्रक्रिया आता प्रलंबित असून त्यासाठी जिल्हा परिषदेचे विशेष सभा बोलाविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
समिती सदस्य पदासाठी अर्ज करण्याची मुदत शनिवारी सकाळी ११ वाजतापर्यंत देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही काही सदस्यांनी अर्ज दाखल केल्याने त्यास इतर काही सदस्यांनी आक्षेप घेतला. तथापि, या पदासाठी प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.- चंद्रकांत ठाकरेअध्यक्ष, जि.प. वाशिमसमिती सदस्य पदासाठी अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ वाजतापर्यंतच होती. या मुदतीनंतर मात्र काँग्रेस व शिवसेनेचे काही सदस्य अर्ज दाखल करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही आक्षेप घेतला. नियमानुसार निवड प्रक्रिया राबवावी, अशी आमची मागणी आहे. त्यात कुणावरही अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा आहे.- स्वप्नील सरनाईकगटनेता, जनविकास आघाडी