वाशिम जिल्हा परिषद: अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ठाकरे, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे गाभणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:34 PM2020-01-17T14:34:33+5:302020-01-17T14:34:39+5:30
अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॉ. श्याम गाभणे यांची अविरोध निवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक १७ जानेवारी रोजी आयोजित होती. कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये ठरल्यानुसार वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॉ. श्याम गाभणे यांची अविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्टÑवादी काँग्रेसला १२ जागेवर विजय मिळविल्याने जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष तर त्यापाठोपाठ काँग्रसने ९ जागेवर विजय प्राप्त केला. शिवसेनेने ६ जागेवर विजय मिळविल्याने महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले होते. परंतु विरोधकांनी सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने सत्ता स्थापनेचा दावा केला होता, तेव्हा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी ताबडतोब मिटींग घेऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरविले. ज्या पक्षाचे बलाबल जास्त त्याप्रमाणे जागा देण्याचेही या मिटींगमध्ये ठरले होते. त्यामुळे विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्याने त्यांनी सत्ता स्थापनेबाबतच्या हालचाली बंद केल्या होत्या. महाविकास आघाडी मित्र पक्षामध्ये ठरल्यानुसार अध्यक्षपद राष्टÑवादी काँग्रेसकडे, उपाध्यक्ष पद काँग्रेसकडे देण्यात आले. सभापतीपदी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना एक-एक तर वंचित बहुजन आघाडीच्या एकास विराजमान केल्या जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.