लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शिक्षकांना दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करणे आवश्यक असताना वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत ३ हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षकांना डिसेंबर महिन्याचे वेतन अर्धा जानेवारी संपत आला तरी, मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, वेतनाची देयके सादर करण्यात आली असली तरी, पंचायत राज समिती जिल्ह्यात दाखल होणार असताना लेखा परीक्षण अहवालाच्या व्यस्ततेमुळे शिक्षकांच्या वेतनाची देयके सादर करण्यास विलंब झाल्याची माहिती आहेशिक्षकांचे दरमहा वेतन उशिरा होत असल्याने त्याबाबत अनेकदा शिक्षक संघटनांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारने १३ ऑगस्ट २0१५ रोजी प्राथमिक शिक्षकांचे पगार दर महिन्याच्या एक तारखेला पगार करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयानुसार शिक्षकांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करता यावे म्हणून पंचायत समितीस्तरावरून ठरलेल्या मुदतीत शिक्षकांच्या वेतनाची देयके शालार्थ प्रणालीद्वारे मुख्यालयाला पाठविण्यासह मुख्यालयातील शिक्षण विभागाने दर महिन्याच्या २0 तारखेपर्यंत सर्व पंचायत समितीची देयके एकत्रित करावी. ती सर्व देयके महिन्याच्या २५ तारखेपर्यंत कोषागारात सादर करावी. त्या देयकांना मंजुरीनंतर महिन्याच्या एक तारखेला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिक्षकांची यादीनुसार त्याच दिवशी बँकेत शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा करणे आवश्यक आहे. तशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक गट शिक्षणाधिकार्यांना परिपत्रकही पाठविण्यात आले आणि या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबर २0१७ पासून करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले होते. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने प्राथमिक शिक्षकांचा दर महिन्याच्या एक तारखेला पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला; परंतु वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत ३ हजारांहून अधिक शिक्षकांचे डिसेंबर २0१७ या महिन्यातील अदा करण्यासाठी देयके सादर करण्याची प्रक्रियाच रखडली. पंचायत समित्यांमार्फत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे ठरलेल्या मुदतीत शिक्षकांच्या वेतनाची देयके ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात आली. तथापि, जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडून कोषागार कार्यालयाकडे ही देयके निर्धारित मुदतीत पोहोचली नाहीत. त्यामुळे जानेवारी २0१८ च्या १६ तारखेपर्यंतही शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा होऊ शकले नाही. दरम्यान, शिक्षकांच्या वेतनाची देयके सादर करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचार्यांशी संपर्क साधला; परंतु त्यांच्याशी संपर्क न झाल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
केंद्रप्रमुखांचे वेतन आठ दिवसांपूर्वीच! वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे वेतन अद्यापही खात्यात जमा झाले नसले तरी, याच कक्षेत येणार्या केंद्र प्रमुखांचे वेतन मात्र ८ दिवसांपूर्वीच त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. केंद्र प्रमुखांचे वेतन आठ दिवसांपूर्वी जमा झाले असले तरी, इतर ३ हजारांहून अधिक शिक्षकांचे वेतन का रखडले, हा प्रश्न मात्र बुचकळय़ात टाकणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील लिपिक प्रशिक्षणासाठी अमरावती येथे गेले असल्याने शिक्षकांच्या वेतनाची देयके कोषागार कार्यालयाकडे पोहोचण्यास विलंब झाल्याची माहिती आहे.
शिक्षकांचे वेतनाची देयके प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत कोषागार कार्यालयाकडे येणे आवश्यक आहे; परंतु डिसेंबर महिन्याच्या वेतनाची देयके ही ५ जानेवारीला मिळाली. त्यानंतर इतर तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांचे वेतन खात्यात जमा करायला विलंब झाला. आज १६ जानेवारी रोजी शिक्षकांच्या खात्यात वेतनाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. -श्याम गाभणेजिल्हा कोषागार अधिकारी, वाशिम
नियमानुसार आमचे वेतन महिन्याच्या १ तारखेला होणे आवश्यक आहे; परंतु डिसेंबर २0१८ या महिन्याचे वेतन १६ जानेवारी रोजी सायंकाळपर्यंतही आमच्या खात्यात जमा झाले नाही. जिल्हा परिषदेमधील संबंधित विभागाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार घडला आहे.- केशव खासबागेजिल्हा सरचिटणीस, साने गुरुजी सेवा संघ वाशिम