- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. २९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार असून, ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढली जाणार की राकॉं, कॉंग्रेस व शिवसेना स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता असल्याने पोटनिवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्रितरित्या सामोरे जाणार की स्वतंत्र उमेदवार उभे करणार हे अद्याप ठरले नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे प्रबळ दावेदार व गतवेळचे विजयी उमेदवार तयारी लागले असून, ऐनवेळी आघाडी झाली तर पंचाईत होण्याची भीतीही इच्छुक उमेदवारांमधून वर्तविली जात आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींनीदेखील वेग घेतला असून, तूर्तास तरी प्रबळ उमेदवारांची चाचपणी प्रत्येक पक्षाकडून केली जात असल्याचे दिसून येते. राकॉं, कॉंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची अद्याप तरी महाविकास आघाडीबाबत चर्चा झाली नसून, वरिष्ठांचा आदेश नेमका काय येईल, याची प्रतीक्षा स्थानिक नेतृत्वाला आहे.
प्रबळ उमेदवारांच्या पळवापळवीची शक्यता!जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून होण्याची दाट शक्यता आहे. या प्रयत्नातूनच प्रबळ उमेदवारांची पळवापळवी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मालेगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे तत्कालिन काही प्रबळ उमेदवार गळाला लागतात का? याची चाचपणी राकॉं, कॉंग्रेससह इतरही पक्षांकडून केली जात असल्याचे तसेच मानोरा तालुक्यात माजी जि.प. सभापती हेमेंद्र ठाकरे यांना कुपटा सर्कलमधून मैदानात उतरविण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेसचे स्थानिक नेते असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. रिसोड तालुक्यात जिल्हा जनविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे प्रबळ उमेदवार कोण राहणार? यावर कॉंग्रेस, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा विशेष वॉच असल्याचे वृत्त आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात इतर पक्षांच्या जिल्हाध्यक्ष किंवा नेत्यांशी अद्याप चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीसंदर्भात वरिष्ठांच्या सुचनेनुसार निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.- चंद्रकांत ठाकरेजिल्हाध्यक्ष, राकॉं वाशिम
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसचे स्थानिक नेते, आमदारांशी चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीबाबत इतर पक्षांशी चर्चा झाली नाही. वरिष्ठांच्या निर्णयानुसार निवडणूक लढविली जाईल.- अॅड. दिलीपराव सरनाईकजिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस वाशिम
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात इतर पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा झाली नाही. या पोटनिवडणुकीला शिवसेना पक्ष संपूर्ण तयारीनिशी सामोरे जाणार असून, स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची तयारी आहे.- सुरेश मापारी,जिल्हाध्यक्ष, शिवसेना वाशिम