लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या निवडणुक निकालानंतर आता सत्तास्थानेच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. तथापि, महाविकास आघाडी करून राज्यात सत्तास्थापन करणाऱ्या काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेकडे जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करण्यासाठी २७ हे संख्याबळ आहे; मात्र जिल्हा परिषदेच्या राजकारणात ‘किंगमेकर’ म्हणून भुमिका गाजविणारे तथा काँग्रेसमधून बाहेर असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख हे आपल्या जनविकास आघाडीच्या ७ सदस्यांना सोबत घेऊन रा.काँ. (१२) आणि भारिप-बमसंच्या (८) साथीने सत्तास्थापन करणार असल्याची खमंग चर्चा रंगत आहे.वाशिम जिल्हा परिषद स्थापनेनंतर अधिकांश काळ काँग्रेसनेच अधिक संख्याबळामुळे अध्यक्षपद उपभोगलेले आहे. अर्थात अनंतराव देशमुख यांनी रिसोड आणि मालेगाव या दोन्ही तालुक्यांमधून नेहमीच अधिक प्रमाणात उमेदवार निवडून आणल्याने ही बाब शक्य होऊ शकली; मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत उमेदवारी डावलल्याच्या कारणावरून देशमुखांनी ही निवडणूक अपक्ष लढविली. यासह जिल्हा परिषद निवडणूकीतही त्यांनी जिल्हा जनविकास आघाडी उघडून काँग्रेस उमेदवारांच्या विरोधातच आपले उमेदवार उभे करून तगडे आव्हान निर्माण केले. यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव होऊन जिल्हा जनविकास आघाडीचे ७ उमेदवार निवडून आले. दुसरीकडे गतवेळच्या निवडणूकीत ८ वर थांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही १२ उमेदवार निवडून आल्याने या पक्षाचेही पारडे जड झाले आहे. भारिप-बमसंच्या यशात गतवेळच्या तुलनेत ५ ची भर पडून ८ उमेदवार निवडून आले. हे दोन पक्ष आणि जनविकास आघाडीचे संख्याबळही २७ असून ते सत्तास्थापनेकरिता पुरेसे असल्याने काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याकरिता ऐनवेळी ही खेळी खेळली जाऊ शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत जिल्हा जनविकास आघाडीचे ७ उमेदवार निवडून आलेले आहेत. सत्तेत सहभागी होण्यास आम्ही निश्चितपणे उत्सुक आहोत; परंतु सद्यातरी यासंदर्भात कुणाकडूनही ‘आॅफर’ आलेली नाही. असा काही प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल.- अनंतराव देशमुखजिल्हा जनविकास आघाडी
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडे सत्तास्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले २७ चे संख्याबळ आहे. त्यामुळे आपसी समन्वय साधून वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन होईल. त्यादृष्टीने विचार-विनिमय सुरू आहे.- चंद्रकांत ठाकरेजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस