लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : फॅन्सी वाहन क्रमांकाची क्रेझ कायम असून, ९९९, ९९९९, ७७७७, ४१४१, ९४९४ आदी क्रमांकांना जास्त पसंती दिली जात आहे. चालू आर्थिक वर्षात २२० फॅन्सी वाहन क्रमांकाची विक्री झाली असून, यामधून परिवहन विभागाला १६ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला. स्वत:ची पसंद, आवड, इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा मोजण्याची तयारी असणाऱ्यांची संख्या कमी नाही. प्रत्येकच क्षेत्रात ‘आवड व निवडी’ने प्रवेश केल्याने विशिष्ट निवडीला अर्थपूर्ण महत्त्व प्राप्त झाले. यामधून वाहनांना द्यावयाचा परवाना क्रमांकही सुटू शकला नाही. ग्राहकांची पसंती पाहून परिवहन विभागाने व्हीआयपी किंवा वेगळी ओळख सांगणारे क्रमांक आरक्षित करून त्याला ‘किंमत’ दिली. फॅन्सी वाहन क्रमांकांच्या शुल्कात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी एप्रिल ते मार्च २०१९ या काळात जिल्ह्यात ४२१ फॅन्सी वाहन क्रमांकाची विक्री झाली. यामधून ३१ लाख २४ हजार रुपयांचा महसूल हा परिवहन विभागाला मिळाला. ९९९, ९९९९, ९४९४, ९०९०, ७७७७, ७७७, ४१४१, ७, १११ या क्रमांकाला सर्वाधिक मागणी आहे. यंदा कोरोनामुळे सुरुवातीच्या एप्रिल ते मे महिन्यादरम्यान अर्थचक्र ठप्पच होते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रशासकीय कामकाजही एप्रिल ते मे महिन्यात प्रभावित झाले होते. जून महिन्यापासून कामकाज पूर्ववत होताच, वाहनमालकांनी मनपसंद व आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गाठले. जून ते नोव्हेंबर या सहा महिन्यांत २२० जणांनी मनपसंद क्रमांक घेतले असून, यासाठी १६ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा महसूल शासन तिजोरीत जमा झाला आहे.
विशिष्ट वाहन क्रमांक आरक्षित करण्यात आले असून, या क्रमाकांसाठी शासन नियमानुसार शुल्क आकारले जाते. गेल्या वर्षी ४२१ क्रमांकाची विक्री झाली असून, यामधून ३१ लाख २४ हजार रुपयाचा महसूल मिळाला. यावर्षी आतापर्यंत २२० वाहन क्रमांकाची विक्री झाली.- ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम