लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : आराेग्यासाठी गुळाचे फायदे पाहता शहरांमध्ये गुळाची चहा पिण्याचे फॅड माेठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील प्रत्येक कॅन्टीन, चहा टपरीवर गुळाच्या चहाची मागणी हाेत आहे. यामुळे गुळाचीही माेठ्या प्रमाणात विक्री हाेत आहे. एकेकाळी साखरेच्या तुलनेत गुळाचे भाव अत्यल्प हाेते आजच्या घडीला साखरेपेक्षा गुळाच्या भावात माेठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.वाशिम शहरात अनेक भागांत ‘स्पेशल गुळाची चहा’ विकणारे दुकाने लागले आहेत. विविध कंपन्यांची फ्रेन्चायजी घेतलेल्या सात कॅन्टीन शहरात दिसून येतात. त्यासाेबतच शहरात काही चहासाठी प्रसिद्ध अशा फार जुन्या कॅन्टीन आहेत. शहरातील फ्रेन्चायजी घेतलेल्या कॅन्टीनमध्ये प्रत्येकी तीन ते साडेतीन किलाे गूळ लागताे. याप्रमाणे जवळपास २१ किलाे गूळ या सात कॅन्टीनमध्ये लागत असून इतर ठिकाणीही १ ते २ किलाे गूळ चहा बनविण्यासाठी लागत आहे. गुळाचा व साखरेच्या चहाची किंमत दहा रुपयेप्रमाणेच असल्याने आराेग्यवर्धक समजल्या जाणाऱ्या गुळाच्या चहाला दिवसेंदिवस मागणी वाढलेली दिसून येत आहे. वाशिम शहरामध्ये छाेटे-माेठे चहाचे एकूण दोन हजारांच्या जवळपास विक्रेते आहेत. यामध्ये काही चहाविक्रेते साेडले, तर प्रत्येक ठिकाणी शहरात गुळाची चहा मिळत आहे. तसेच ब्लॅक टी, लेमन टी पिणाऱ्यांचीही संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून येत आहे.
गुळाच्या चहाचे फायदेगुळाचा चहा पिण्यामुळे शरीराला आवश्यक असणारे अनेक पेाषक घटक मिळतात. कारण गुळामध्ये लाेह, मॅग्नेशियम, पाेटॅशियम, मॅंगनिज, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, जस्त, फाॅस्फरस व तांबे यांसरखीअनेक महत्त्वाची पाेषकतत्त्वे असतात. यामानाने साखरेत काेणतेही पाेषक घटक नसतात. त्यामुळे आराेग्याचा विचार करता गुळाचा चहा पिणे फायदेशीर असल्याचे ठरते.