गेल्या काही वर्षांत मोबाईल ही जीवनाश्यक बाब बनली आहे. मोबाईलशिवाय कुठलेच काम होणे सध्यातरी अनेकांसाठी अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या खिशात मोबाईल असतोच. त्यात काही लोक महागडे मोबाईल वापरतात. हीच बाब हेरून मोबाईल चोरटेही सक्रिय झाले आहेत. वाशिमच्या बाजारात २०२० या वर्षांत खिशातून मोबाईल लंपास केल्याच्या १५० पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत; तर ४५ नागरिकांनी स्वत:च मोबाईल हरविले आहेत. यासंबंधीच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या असून त्यातील ७० मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
.....................
२०२० मध्ये दाखल झालेल्या तक्रारी
जानेवारी - २५
फेब्रुवारी - १९
मार्च - ११
एप्रिल - १०
मार्च - ६
एप्रिल - ५
मे - १२
जून - ११
ऑगस्ट - ११
सप्टेंबर - १७
ऑक्टोबर - २२
नोव्हेंबर - २५
डिसेंबर - २२
.........................
बॉक्स :
बसस्थानकात जाताय, मोबाईल सांभाळा!
गेल्या वर्षभरात म्हणजे २०२० मध्ये मोबाईल चोरीला गेल्याच्या सर्वाधिक घटना वाशिम बसस्थानकातच घडल्या आहेत. एस.टी.त चढताना आणि उतरताना गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास करीत आहेत. यासह सणासुदीच्यावेळी बाजारात जेव्हा नागरिकांची तोबा गर्दी होते, तेव्हाही मोबाईल चोरीच्या घटना सर्वाधिक प्रमाणात घडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांनी मोबाईल सांभाळावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
..............
हरवले १९५, सापडले केवळ ७०
वर्षभरात एकूण १९५ मोबाईल हरवले किंवा चोरीला गेले आहेत. संबंधित नागरिकांनी तशी फिर्याद पोलीस स्टेशनला नोंदविली आहे. महत्प्रयासाने त्यातील ७० मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून अद्याप ११५ मोबाईलचा शोध लागलेला नाही. मोबाईलचा शोध घेणे, ही तुलनेने जिकरीची बाब असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे.
...............
कोट :
खिशात महागडे मोबाईल घेऊन फिरताना तो चोरी होऊ नये किंवा हरवू नये, याची काळजी स्वत: नागरिकांनाच घ्यावी लागणार आहे. मोबाईलचा शोध घेण्याकामी पोलीस कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करतात; मात्र त्यात बराच वेळ खर्ची घालावा लागतो. कधीकधी मोबाईलचा शोध घेण्यासाठी इतर राज्यातही जावे लागते. त्यामुळेच तपासाला वेळ लागतो.
- शिवाजी ठाकरे
पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम