वाशिम : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ जुलैदरम्यान महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, प्रशासकीय, वैद्यकीय, राजकीय, उद्योजक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, रक्ताचं नातं घट्ट करण्यासाठी वाशिमकर सरसावले असल्याचे दिसून येते.
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कधी काय होईल याची शाश्वती देता येत नाही. अपघाती घटनांमध्ये रुग्णाचा प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यक भासते. वेळीच रक्त न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यूही होतो. कोरोनाकाळात रक्ताची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. ही गरज भागविण्यासाठी ‘लोकमत’ समूहाने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदानाच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामाजिक संघटनांसह प्रशासकीय, वैद्यकीय, राजकीय, उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांनी केले आहे. वाशिम जिल्हा पोलीस विभाग, रक्तदान ग्रुप, साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आदी रक्तदानाच्या या महायज्ञात सहभागी होत असून, इतरांनीदेखील सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
००००
कोट बॉक्स
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, अपघाती घटनांमध्ये रुग्णाचा प्राण वाचविण्यासाठी रक्ताची गरज भासते. मी स्वत: रक्तदान करणार असून, इतरांनीदेखील रक्तदान करावे.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम
००००
रक्तदानामुळे अनेक फायदे होतात. मी स्वत: रक्तदान करणार आहे. रक्तदान हे तीन महिन्यांतून एकदा म्हणजेच वर्षातून ४ वेळा करता येते. रक्तदान हे जीवनदान होय.
- डॉ. विवेक साबू, संचालक
साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, वाशिम
..........
रक्ताची गरज आणि तुटवडा लक्षात घेता प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक आहे. आमचा रक्तदान ग्रुप रक्तदानाच्या या महायज्ञात सहभागी होत असून, सर्वांनी सहभाग नोंदवावा.
- पंकज गाडेकर
अध्यक्ष, रक्तदान ग्रुप, वाशिम
०००