लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ ते १५ जुलैदरम्यान महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक, प्रशासकीय, वैद्यकीय, राजकीय, उद्योजक, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, रक्ताचं नातं घट्ट करण्यासाठी वाशिमकर सरसावले असल्याचे दिसून येते.आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कधी काय होईल याची शाश्वती देता येत नाही. अपघाताच्या घटनांमध्ये रुग्णाचा प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यक भासते. काही रुग्णांचा वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. कोरोनाकाळात रक्ताची प्रचंड टंचाई निर्माण झाली. ही गरज भागविण्यासाठी ‘लोकमत’ समूहाने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील रक्तदात्यांनी स्वयंस्फूतीर्ने पुढे येऊन या पवित्र कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस विभाग, रक्तदान ग्रुप, साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वाशिम यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी केले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, अपघाताच्या घटनांमध्ये रुग्णाचा प्राण वाचविण्यासाठी रक्ताची गरज भासते. रक्ताचं नातं जोपासण्यासाठी सर्वांनी रक्तदान करावे. मी स्वत: देखील रक्तदान करणार आहे.- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम
रक्तदानामुळे अनेक फायदे होतात. मी स्वत: रक्तदान करणार आहे. रक्तदान हे तीन महिन्यांत एकदा म्हणजेच वर्षातून ४ वेळा करता येते. रक्तदान जीवनदान होय.- डॉ. विवेक साबू, संचालक, साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वाशिम
रक्ताची गरज आणि तुटवडा लक्षात घेता प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक आहे. रक्तदानामुळे गरजूंचे प्राण वाचतात. आमचा रक्तदान ग्रुप रक्तदानाच्या या महायज्ञात सहभागी होत असून, सर्वांनी सहभाग नोंदवावा.- पंकज गाडेकरअध्यक्ष, रक्तदान ग्रुप वाशिम