वाशिम : रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती दिनापासून (दि. २ जुलै) ‘लोकमत’तर्फे आयोजित शिबिरात रक्तदान करण्यासाठी नोंदणीस वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
वाशिम शहरातील दोन्ही रक्तपेढ्यांमध्ये कधीकाळी रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध असायचा; मात्र जिल्ह्यात गतवर्षीपासून उद्भवलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात हे प्रमाण सातत्याने घटत चालल्याचे दिसून येत आहे. सिकलसेल, थॅलेसेमिया यासारखे गंभीर व दुर्मीळ आजार जडलेल्या रुग्णांना प्रत्येक महिन्याला रक्त द्यावे लागते. याशिवाय प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्त्राव झाल्यास, अपघातांमध्ये गंभीर जखमी झाल्यास संबंधितांनाही रक्ताची गरज भासते. रक्त वेळेवर मिळाले नाही तर अनेकांना प्राणासही मुकावे लागते. रक्ताची ही गरज ओळखून रक्तदानाच्या या महायज्ञात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला साद घालत नोंदणीसाठी वाशिमकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध सामाजिक संघटना, राजकीय, वैद्यकीय, शिक्षण, व्यापारी, प्रशासन आदी घटकांचा प्रतिसाद मिळत असून, इतरांनीदेखील सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
००००
रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सर्वांनी पुढाकार घेणे अपेक्षीत आहे. रक्तदान हेच जीवनदान असून, संकटकाळात सापडलेल्या रुग्णांना रक्तामुळे जीवनदान मिळू शकते. एखाद्याचा जीव वाचविणे यापेक्षा कोणतेही काम मोठे असू शकत नाही. रक्तदानातून ते शक्य होते. सामाजिक बांधिलकी म्हणून या कार्याकडे प्रत्येकाने बघावे.
- अमित झनक,
आमदार, कॉंग्रेस
००००००००००
कोरोनाकाळात मागणीच्या तुलनेत रक्त संकलन झाले नाही. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे नॉन कोविड शस्त्रक्रिया होतील. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून सर्वांनी रक्तदानात सहभागी होणे अपेक्षीत आहे. मी स्वत: रक्तदान करणार असून, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाºयांनादेखील स्वयंस्फुर्तीने, स्वयंप्रेरणेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
- डॉ. शाम गाभणे
अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम
०००००
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कोरोनाच्या कालावधीत रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. हा तुटवडा भरून काढण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करणे अपेक्षीत आहे. रक्तदानासाठी ‘लोकमत’ने घेतलेला पुढाकार प्रशंसनीयअसून, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच युवकांनी या महायज्ञात सहभागी व्हावे.
-डॉ. अनिल कावरखे
जिल्हाध्यक्ष, आयएमए वाशिम
००००००००