लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लाखो रुपये खर्चून येथील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालयासह अन्य प्रशासकीय कार्यालयांवर लावलेल्या पवनऊर्जाच्या खांबांवरील पाते तुटून संयंत्र पूर्णत: निकामी झाले आहे. यामुळे शासनाच्या अपारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरास गती देण्याच्या मूळ उद्देशांना प्रशासकीय पातळीवरूनच हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक ऊर्जास्त्रोतांवरील ताण कमी होवून अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयांनी अपारंपरिक ऊर्जा वापराकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. काही वर्षांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीवर तब्बल नऊ पवजऊर्जा संयंत्र उभारण्यात आले. ते कार्यान्वित झाल्यानंतर महावितरणकडून घेतली जाणारी वीज बंद करून पुढचे काही महिने पवनऊर्जेच्या माध्यमातून पोलिस अधीक्षक कार्यालयात वीज वापरली जाऊ लागली. मात्र, कालांतराने खांबांवरील पाते पूर्णत: तुटून कोलमडले. सद्या नऊपैकी केवळ एकाच खांबावर तीन पाते आढळून येतात; तर अन्य आठ खांब विनापात्याचेच निव्वळ शोभेची वस्तू म्हणून उभे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या पवनऊर्जा संयंत्रांचीही अशीच केविलवाणी स्थिती असून अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांऐवजी पुर्वीप्रमाणेच महावितरणच्या विजेवर प्रशासनाचा कारभार चालत आहे. यासाठी महिन्याकाठी लाखो रुपयांचे वीज देयक अदा करावे लागत आहे. मात्र, विशेष तरतूद करून नादुरूस्त झालेल्या पवनचक्या दुरूस्त करून घेण्याकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
वाशिमच्या प्रशासकीय कार्यालयांवरील पवनऊर्जा संयंत्रांचे तुटले पाते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:58 PM