वाशिमचा ‘आमलन’ अडकला रोमानिया सीमेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 19:48 IST2022-02-27T19:47:52+5:302022-02-27T19:48:08+5:30
Washim's 'Amalan' stuck on Romania border : आमलन व्यास हा गत ४ वर्षांपासून युक्रेनमधील विनितासा येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

वाशिमचा ‘आमलन’ अडकला रोमानिया सीमेवर!
वाशिम : रशियाच्या हल्ल्यानंतर हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. वाशिम शहरातील प्रकाश व्यास यांचा मुलगा आमलन व्यास हा रोमानिया सीमेवर अडकला असून, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर माहिती कळविली असे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले.
आमलन व्यास हा गत ४ वर्षांपासून युक्रेनमधील विनितासा येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धाचा फटका हजारो भारतीय विद्यार्थ्यांना बसत आहे. युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जाणार आहे. आपल्या देशात परतण्यासाठी आमलन याच्यासह जवळपास दोन हजार विद्यार्थी हे रोमानिया सीमेवर उभे आहेत. अद्याप या विद्यार्थ्यांना रोमानियाच्या सिमेवर प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. रोमानियात प्रवेश मिळाल्यास तेथून भारताचे विमान मिळणार असल्याने या विद्यार्थ्यांना रोमानियामध्ये प्रवेश द्यावा आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, असे मत आमलनचे वडील प्रकाश व्यास यांनी व्यक्त केले.
चार दिवसांपासून व्यास कुटुंब चिंतेत
आमलनच्या कुटुंबियांनी सांगितले की, ४ दिवसांपासून चिंतेत आहेत. आमलन हा आमच्या संपर्कात असून, क्षणोक्षणी माहिती देत आहे, आता तो रोमानियाच्या सीमेवर पोहोचला आहे, तो लवकर घरी यावा, ही प्रार्थना आम्ही करत आहोत, असे व्यास कुटुंबाने सांगितले. त्यांच्याकडे अन्नपदार्थ संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, अशी आर्त हाकही व्यास यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यातील एक विद्यार्थी यूक्रेनमध्ये रोमानिया बॉर्डरला अडकला आहे. त्यासंबंधी सर्व माहिती वरीष्ठ स्तरावर कळविण्यात आली आहे. मी स्वत: पालकांच्या संपर्कात आहे.
- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम