वाशिम: फर्ममार्फत कार्यालयास पुरविण्यात आलेल्या शिपाई व चौकीदारांचे जुलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीतील बिल काढण्यासाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या यांत्रिकी उच्चालक उभारणी व दुरूस्ती उपविभाग वाशिमच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३० ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. अजय विश्वनाथ कोल्हे (४५) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराच्या फर्ममार्फत उपअभियंता यांत्रिकी उच्चालक उभारणी व दुरूस्ती उपविभाग वाशिम या कार्यालयास शिपाई व चौकीदार पुरविण्यात आले होते. जुलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीतील त्यांचे बिल काढण्यासाठी सहायक अभियंता कोल्हे यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यावरून ६ ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली तसेच १० ते ३० ऑक्टोबर या कालावधीत सापळा रचण्यात आला. यादरम्यान आरोपीला तक्रारदारावर संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच रक्कम स्विकारली नाही. यावरून आरोपीस ताब्यात घेऊन वाशिम शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या चमुने पार पाडली.