वाशिमचा नारायण व्यास सायकलने गाठणार वाघा बॉर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 4:45 PM
कसून तयारी : शांती, एकात्मतेचा संदेश घेऊन १ मार्चला होणार रवाना
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील सायकलपटू नारायण व्यास हे शांती व एकात्मतेचा संदेश देत वाशिम ते वाघा बॉर्डर हे अंतर सायकलने पूर्ण करणार आहे. त्यासाठी त्याची दिवसरात्र कसून तयारी सुरू असून १ मार्चला तो वाशिम येथून रवाना होणार आहे. पाच राज्य ओलांडून १२ मार्चपर्यंत वाघा बॉर्डर गाठण्याचा मानस त्याने व्यक्त केला.यासंदर्भात अधिक माहिती देताना नारायणने सांगितले, की सद्याच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकास विविध स्वरूपातील शारिरीक व्याधींनी त्रस्त केले आहे. दैनंदिन सायकल चालवून व्याधींना दुर ठेवणे शक्य आहे, हा संदेश देण्यासाठी सायकलने वाशिम ते वाघा बॉर्डर हे अंतर पूर्ण करण्याचे ध्येय आपण बाळगले. याशिवाय सद्या देशाचे वातावरण अस्थिर झाले आहे. ते स्थिर होऊन शांती व एकात्मता नांदावी, हा संदेश देखील यामाध्यमातून आपण देणार आहोत. वाशिमवरून इंदौर, उज्जैन, कोटा राजस्थान, अजमेर, पुष्कर, सालासर, हिसार, हरियाणा, अमृतसर ते वाघा बॉर्डर असा आपला प्रवास राहणार असून तो १२ दिवसांत पूर्ण करण्याचे ध्येय बाळगल्याची माहिती नारायण व्यासने दिली. त्यासाठी गत काही दिवसांपासून सातत्याने सायकल चालविण्याचा सराव आपण करित असल्याचेही तो म्हणाला.