लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: श्रावण मासानिमित्त शिवलिंगाच्या जलाभिषेकसाठी कावडव्दारे जल आणण्याकरिता परळी वैजनाथ येथे गेलेल्या कावडधारी युवकास परळी ते परभणी मार्गावरुन उचलून पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या वाशिम बंदला १00 टक्के प्रतिसाद मिळाला. यामुळे दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.बुधवार, २ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील शुक्रवारपेठ भागातील विठ्ठल मंदिर परिसरात दोन गटात दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेत एम.एच.३७ व्ही १0१0 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनासह सात ते आठ मोटारसायकलचीदेखील तोडफोड करण्यात आली. परिसरातील पथदिवे तसेच अनेक घरांसमोरील विद्युत मीटरचीसुध्दा या घटनेत नासधूस करण्यात आली. मोठय़ा प्रमाणात झालेल्या दगडफेकीमुळे तीन जण गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. याप्रकरणी प्रवीण सुरेश खुळे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील २५ ते ३0 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, काही युवक श्रावण मासानिमित्त परळी वैजना थ येथे कावड घेऊन गेले होते. परतीच्या प्रवासात वाशिमकडे पायी येत असताना त्यातील एका युवकास वशिम पोलिसांनी मारहाण करून परभणी येथून वाशिमला आणले व अटक केली. यामुळे मात्र हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या. सदर घटनेच्या निषेधार्थ वाशिम शहरात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. वाशिम पोलिसांच्या निषेधार्थ पहिल्यांदाच शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, शहरातील बाजारपेठेत यामुळे दिवसभर शुकशुकाट पसरला होता. शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, लहान-मोठे व्यापारी, भाजीपाला मार्केट, फळ विक्रेते आदिंनी स्वयंस्फूर्तीने आपा पली दुकाने बंद ठेवून शिवभक्तावरील कारवाईचा निषेध नोंदविला. यादरम्यान, ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
अत्यावश्यक सुविधांना बंदमधून वगळले!आजच्या ‘वाशिम बंद’मधून शहरातील रुग्णालये, मेडिकल्स, बँका, शासकीय-निमशासकीय कार्यालये, राज्य परिवहन तसेच शाळा व महाविद्यालय या अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आले होते. त्यामुळे कुणाचीही विशेष गैरसोय झाली नाही.