मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार सन्मानवाशिम : विविध स्वरूपातील विकासकामांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याप्रकरणी वाशिम नगरपालिकेला अमरावती विभागातून उत्कृष्ट कार्याचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन कोटी रुपये स्वरूप असलेला हा पुरस्कार स्वीकारण्याकरिता मुख्याधिकारी गणेश शेट्टे आणि नगराध्यक्ष अशोक हेडा हे बुधवार, ३ मे रोजी मुंबईला रवाना झाले असून, ४ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.वाशिम नगर परिषदेने शहरी भागातील स्वच्छ भारत अभियानमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून, भूमिगत गटार योजना, नवीन पाणीपुरवठा योजना, करवसुली, अपंग कल्याण दुर्बल घटक योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींकरिता राबविण्यात आलेल्या विविध महत्त्वाकांक्षी योजना यासह इतरही कामांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. एकूणच या सर्व कामांचे शासनाने योग्यरीत्या मूल्यमापन करून वाशिम नगरपालिकेला अमरावती विभागातून उत्कृष्ट कार्याचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला. त्याचे वितरण मुंबई येथे ४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, पुरस्कार स्वीकारण्याकरिता मुख्याधिकारी शेट्टे हे मुंबईला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम पालिकेला तीन कोटींचा पुरस्कार
By admin | Published: May 04, 2017 1:25 AM