लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १७ व्या पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या आयोजनाचा मान यंदा वाशिम जिल्हा पोलीस दलाला मिळाला होता. सदर स्पर्धा १९ ते २१ आॅगस्टदरम्यान उत्साहात पार पडल्या. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधून ११२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेत वाशिम जिल्हा पोलिस दलाने चमकदार कामगिरी करित ५ सुवर्ण व एका कांस्य पदकाची कमाई केली.१९ आॅगस्टपासून तीन दिवस चाललेल्या या कर्तव्य मेळाव्यामध्ये अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमधील ११२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात ३२ पोलीस अधिकारी व ८० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सदर स्पर्धेत पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्याची चाचणी व व्यावसायिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. घातपात विरोधी तपासणी, पोलीस व्हीडीओग्राफी, फोटोग्राफी, श्वानपथकाच्या कामगिरी याचाही मेळाव्यात समावेश करण्यात आला. ३ दिवस झालेल्या विविध स्पर्धांमध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनिय कामगिरी करत ५ सुवर्ण पदक व १ कांस्य पदक मिळवत अव्वल स्थान पटकाविले. व्दितीय क्रमांक १ सुवर्ण पदक व ३ कांस्य पदकासह अमरावती ग्रामीण व ३ रौप्य व एका कांस्य पदकासह अकोला जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिला. सदर स्पर्धेची जनरल चॅम्पीयनशिप वाशिम जिल्हा पोलीस दलाने पटकावली. तसेच विजयी स्पर्धकांना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक मकरंद रानडे यांच्याहस्ते पदक देउन गौरविण्यात आले.१७ व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचा समारोपीय सोहळा नवीन पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे पार पडला. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक मकरंद रानडे व जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कर्तव्य मेळाव्यात वाशिम पोलिसांची चमकदार कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 2:28 PM