मंगरुळपीर: स्थानिक बसस्थानकावर प्रवाशांना चक्क दूषित तथा गाळमिश्रित पाणी प्यावे लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून उघड झाला आहे. या गंभीर बाबीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. मंगरूळपीर हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी शहराच्या बाह्यभागात वाशिम मार्गावर प्रशस्त असे बसस्थानक गेल्या ३५ वर्षांपूर्वी उभारण्यात आले. बसस्थानकाचा परिसर प्रशस्त असून, परिसरातील डांबरीकरणाचे काम दर्जेदार असल्याने ते आजही टिकून आहे. किंबहुना अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील बसस्थानकांत सर्वात चांगली अवस्था असलेले हे एकमेव बसस्थानक असावे. तथापि, या ठिकाणी प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या काही सुविधांकडे आगार व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी प्रवासी आपसातील चर्चेत करीत होते. या पृष्ठभूमीवर लोकमतच्या वतीने बसस्थानकात मंगळवार २ मे रोजी स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. यामध्ये बसस्थानकावरील पंखे बंद असल्याचे, तसेच प्रसाधनगृहांची नीट सफाई होत नसल्याचे दिसलेच शिवाय धक्कादायक बाब म्हणजे प्रवाशांना ज्या टाकीतून पिण्यासाठी पाणी सोडले जाते. त्या टाकीची गेल्या अनेक दिवसांपासून सफाईच झाली नसल्याचे आणि त्यामध्ये घाण कचरा पडल्याचे आढळून आले. सदर टाकीचे झाकण उघडेच असल्यामुळे त्या पाण्यात पाल मरून पडल्यास विषारी पाणी प्रवाशांच्या पिण्यात येऊन त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. अथवा घाणपाण्यामुळे प्रवाशांना विविध आजार जडण्याचीही शक्यता आहे. प्रवाशांना अतिरिक्त सुविधा देण्याची दखल घेण्याऐवजी आवश्यक सुविधांचाच या ठिकाणी अभाव आहे. विशेष म्हणजे बसस्थानकाच्या गच्चीवर जुगाराचा खेळही होत असल्याची शंकाही या ठिकाणी पडलेल्या ताशपत्त्यांवरून येत आहे.बसस्थानकात प्रवाशांसाठी बसविण्यात आलेली पाण्याची टाकी महिन्यातून तीन वेळा साफ केली जाते. प्रवाशांना घाण पाणी पाजण्याचा प्रकार आम्ही करीत नाही. इतउपरही पाण्याच्या टाकीत घाण साचली असेल, तर तर ती त्वरित साफ करून त्यात पुन्हा पाणी भरण्यात येईल. -युधिष्ठिर रामचवरे, आगार व्यवस्थापक, मंगरुळपीर आगार
प्रवाशांना पाजले जातेय दूषित पाणी!
By admin | Published: May 03, 2017 1:46 AM