वाशिम, दि. १६- दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. या माध्यमातून जलसंवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र लोकसहभागातून व श्रमदानातून ही चळवळ वाढविण्याचा प्रयत्न असून याकरिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांमधील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत रविवार, १६ ऑक्टोबरला पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, कोणत्याही कामामध्ये लोकसहभाग मिळाल्याशिवाय ते काम यशस्वी होत नाही. त्यामुळे जलसंवर्धन चळवळीला शाश्वत स्वरूप द्यायचे असेल, तर त्यामध्ये लोकसहभाग वाढणे आवश्यक आहे. लोकांनी आपले गाव जलयुक्त करण्यासाठी सकारात्मक विचारांसह पुढे यावे. श्रमदानाच्या माध्यमातून गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरू करावीत. अशा कामांना प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार सहकार्य केले जाईल. आपल्या गावासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपल्या गावासाठी आपण काहीतरी केले याचे समाधान मिळेल, तसेच गावामधील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. अभिनेता आमीर खान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्यपाणी फाउंडेशनह्णद्वारे श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणार्या गावांची स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस दिले जाते. त्यामुळे श्रमदानातून जलसंवर्धन करण्याची चळवळ रुजत आहे. या स्पर्धेकरिता वाशिम जिल्ह्यातूनही काही तालुक्यांची निवड व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे आपल्या गावात जलसंवर्धनाची कामे श्रमदानातून करण्यासाठी गावकर्यांनी, पदाधिकार्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले.
लोकसहभागातून जलसंवर्धन चळवळ वाढविणे गरजेचे!
By admin | Published: October 17, 2016 2:10 AM