लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाळा अवघ्या २० दिवसांवर आला असताना कृषी विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियानातील प्रलंबित कामे करण्याची लगबग सुरू झाली असून, यात सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत माती नाला बांधाचे खोलीकरण, गाळ काढणे आणि ढाळीच्या बांधांच्या कामांचा समावेश आहे.वाशिम जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची अनेक कामे प्रलंबित आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याने ही कामे खोळंबली होती; परंतु मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि वाशिम जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली असताना दुष्काळ निवारणासाठी उपयुक्त अशा कामांना आचार संहितेतून शिथिलता देण्याची मागणी राज्य शासनाकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने दुष्काळी स्थितीचा विचार करून राज्य शासनाच्या मागणीनुसार दुष्काळी कामे करण्याची मुभा दिली. त्यामुळे जलयुक्त शिवारची कामे करण्याचा मार्गही मोकळा झाला आणि प्रलंबित असलेली कामे कृषी विभागाकडून वेगाने सुरू करण्यात आली. यात प्रामुख्याने ढाळीचे बांध, शेत बंधारे, माती नाला बांधातील गाळ उपसा आणि खोलीकरणाच्या कामांचा समावेश असून, या कामांसाठी सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत जेसीबी, पोकलन मशीनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बहुतांश कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन त्याचा फायदा शेतकºयांना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुजलाम, सुफलाम अंतर्गत जलयुक्त शिवारची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 5:32 PM