मालेगाव - जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात मालेगाव तालुक्यातील ४२ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासंदर्भातचा अहवाल पंचायत समिती प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सादर केला.
आमदार अमित झनक यांनी २७ नोव्हेंबरला पाणीटंचाईसंदर्भात आढावा बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने चाचपणी करून ग्रामपंचायत स्तरावरून पाणीटंचाई व उपाययोजना यासंदर्भात अहवाल मागविले होते. पाणीटंचाई निवारण कक्षाचे प्रमुख श्रीराम आदमणे यांनी तातालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांशी संपर्क साधून पाणीटंचाईसंदर्भात सद्यस्थिती, भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई व करावयाच्या उपाययोजना आदींची माहिती मागविली होती. त्या अनुषंगाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत ४२ गावांत पाणीटंचाई उदभवण्याची माहिती सादर झाली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ विहिर किंवा बोअर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, बोअरवेल आदी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. गांगलवाडी, देवठाणा खांब, वरदरी बु., खेर्डी, पांगरी कुटे, एकांबा, पिंपळवाडी, खैरखेडा, वाकळवाडी, भिलदूर्ग, काळाकामठा यासह १२ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. कायमस्वरुपी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार अमित झनक यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने उपाययोजना करण्यासाठी नियोजन चालविले आहे.
यावर्षी मालेगाव तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. भिलदूर्गसारख्या डोंगराळ भागातील गावाला नदीपात्रातील झरे शोधून पाणी आणण्याची कसरत करावी लागते. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यातील उपाययोजना प्रत्यक्षात साकारल्या जातात की कागदावरच राहतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे.