वाशिम : मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांची मोठी धडपड सुरू असून, घरी पिण्यासाठी पाणी न्यावे म्हणून चिमुकल्या मुली नळावर पाण्यासाठी प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र मंगरुळपीर शहरात शुक्रवारी सकाळी पाहायला मिळाले. नगर परिषदेच्या कूपनलिकेतील पाणी नळातून केव्हा येते, यासाठी या मुली पाण्याचे भांडे ठेवून उभ्या होत्या.
गतवर्षीच्या अपु-या पावसामुळे मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा धरण कोरडे झाले असून, शहरात २५ दिवसांपासून नळाचे पाणीच आले नाही. त्यातच पालिकेच्यावतीने पाणी पुरवठ्याचे पर्यायी उपाय अद्यापही करण्यात आले नाहीत. सर्वसाधारण लोक मोठ्या प्रमाणात पैसा खर्चून खाजगी टँकरने गरजा भागवित आहेत. गोरगरीबांच्या घशाची कोरड मिटविण्यासाठी मात्र पुरेसे प्रयत्नच होताना दिसत नाही. काही समाजसेवकांनी प्रसिद्धीपुरती जलसेवा सुरू करून पाण्यासाठी भटकणा-या लोकांची क्रूरथट्टाच चालविली आहे. मंगरुळपीर पालिकेने काही ठिकाणी हातपंप दुरुस्ती केली, काही कुपनलिकांचीही दुरुस्ती केली; परंतु त्या उपाययोजनाही नागरिकांची तहान भागविण्यास असमर्थ आहेत.
मंगरुळपीर शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये नगर परिषदेने टाऊनहॉलमधील कूपनलिका दुरुस्त केली. यासाठी स्थानिक नगरसेवकानेच सहकार्य केले. कुपनलिकद्वारे पाण्याची टाकी भरून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना थोडेफार पाणी मिळत आहे. तथापि, अनेकांच्या घरातील भांड्यात या कुपनलिकेचे पाणीच पडलेले नाही. शुक्रवारी सकाळी या कुपनलिकेच्या नळावर दोन चिमुकल्या नळातून पाणी येण्याची प्रतीक्षा करीत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले.